Type Here to Get Search Results !

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई; १९ लाखांहून अधिक किमतीचा साठा .


अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई; १९ लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त

पुणे : अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आंबेगाव व खेड तालुक्यातील ५ ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण १९ लाख ३ हजार ३७९ रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती पुणे विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) दि. वा. भोगावडे यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे साईराज पान अँड टी हाऊस तसेच समीक्षा कोल्ड्रिंक जनरल अँड किराणा स्टोअर यांच्या मागील गोदामांमध्ये गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आले. याठिकाणी ३० हजार ३९५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याचवेळी मंचर येथील खेमराज फूड इंडस्ट्रीज प्रा. लि. ही आस्थापना विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला १९ हजार ८८६ किलो मैदा, बेसन, आटा व इतर अन्नपदार्थांचा १० लाख ४९ हजार ३६४ रुपयांचा साठा नमुना विश्लेषणासाठी घेऊन जप्त करण्यात आला.

खेड तालुक्यातील खालची भांबुरवाडी येथील उज्वल सुपारी या आस्थापनेतही विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. येथील १ हजार ८९८ किलो वजनाची आणि ८ लाख १६ हजार १४० रुपये किमतीची सुपारी अप्रमाणित अथवा असुरक्षित असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आली.

तसेच नरे येथील ओम साई फरसाण या आस्थापनेच्या तपासणीत फाईड ग्रीन वाटाणा या अन्नपदार्थात कृत्रिम रंगाचा वापर केल्याचे आढळून आले. त्यानुसार संबंधित अन्नपदार्थ आणि वापरल्या जाणाऱ्या रंगाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ६८ किलो वजनाचा ७ हजार ४८० रुपये किमतीचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती मरके, सुप्रिया जगताप, संतोष सावंत, सतीश हाके, प्रकाश कचवे, लक्ष्मीकांत साळवे, अभिजीत झोडगे, आदित्य जोशी, सकेत सूर्यवंशी आणि नमुना सहाय्यक श्री. साळवे यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडली.

अन्न व औषध प्रशासनाने ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या, भेसळयुक्त व बेकायदेशीर अन्न उत्पादन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी संशयास्पद बाबींची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

— चास न्यूज Live मराठी

Post a Comment

0 Comments