Type Here to Get Search Results !

खेड तालुक्याला मेट्रोची मोठी आशा! राजगुरुनगर व पानमळापर्यंत मेट्रो विस्ताराची आमदार बाबाजी काळे यांची ठाम मागणी.

🚨 ब्रेकिंग न्यूज | चास न्यूज Live मराठी 🚨

खेड तालुक्याला मेट्रोची मोठी आशा! राजगुरुनगर व पानमळापर्यंत मेट्रो विस्ताराची आमदार बाबाजी काळे यांची ठाम मागणी

खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी प्रस्तावित निगडी भक्ती-शक्ती चौक – मुकाई चौक – वाकड – नाशिक फाटा – संत तुकाराम नगर – गवळीमाथा – लांडेवाडी – भोसरी – चाकण मेट्रो मार्गिकेचा विस्तार राजगुरुनगर व पानमळापर्यंत करण्यात यावा, अशी आक्रमक व ठाम मागणी आमदार बाबाजी काळे यांनी महामेट्रोच्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) सादरीकरण बैठकीत केली.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत त्यांनी खेड तालुक्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. चाकण हे देशातील प्रमुख औद्योगिक केंद्र असल्याने दररोज हजारो कामगार, उद्योजक, विद्यार्थी व नागरिकांची ये-जा होत असल्यामुळे मेट्रोचा विस्तार राजगुरुनगर व पानमळापर्यंत करावा, अशी त्यांनी भूमिका मांडली.

तसेच तळवडे – निघोज – म्हाळुंगे – चाकण या पट्ट्याचाही नव्या मेट्रो नियोजनात समावेश करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, प्रशस्त पार्किंग, फीडर बस सेवा, औद्योगिक क्षेत्रांशी प्रभावी जोडणी आणि भविष्यातील विस्ताराचा स्पष्ट आराखडा डीपीआरमध्ये समाविष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली.

सध्या खेड तालुक्यात चिंबळी फाटा, बर्गे वस्ती, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी आणि चाकण अशी सहा मेट्रो स्थानके प्रस्तावित आहेत. खेड तालुक्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व सुधारणा व मेट्रो विस्तारासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले.

या उच्चस्तरीय बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर तसेच महामेट्रो व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments